श्री प्रभू आणि श्री राव यांनी संपादित केलेल्या 'महात्मा गांधींचे विचार' या पुस्तकाची सुधारित आणि वाढवलेली आवृत्ती नवजीवन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, या नवीन आवृत्तीत गांधीजींचे अखेरच्या क्षणापर्यंतचे विचार उद्धृत करण्यात आले आहेत. त्यामुळे ही आवृत्ती अद्ययावत बनली आहे, लोकोत्तर पुरुषांच्या मनात काय असते हे कोणाला माहीत हे भवभूतीचे वचन सर्वश्रुत आहे. गांधीजी लोकोत्तर पुरुष असतानाही त्यांनी आपले मन लोकांसमोर उघडे करून ठेवले होते. आपल्याकडून त्यांनी काहीच दडवून ठेवले नव्हते. तरीही त्यांच्या जीवनाचे अंतिम पर्व, ज्याला मी स्वर्गारोहण पर्व असे नाव दिले आहे, एवढेच नाही तर ते भगवान कृष्णाच्या अंतिम लीलेसारखेच वाटले. ते गूढ उकलण्याकरिता तर गांधीजींनाच परत यावे लागेल. परंतु तोपर्यंत सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वोदय साधकांना गांधीजींचे विचार समजण्याकरिता या पुस्तकाची नक्कीच मदत होईल अशी मला आशा आहे.