‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची.
पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित.
भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.