"राधेय’ ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. प्रास्ताविकेत देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं ? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.